नवी दिल्ली (वृत्तसंस्था) –आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) 13 व्या मोसमाला 15 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. जगात सध्या कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत आहे. भारतातही 70हून अधिक व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्याचाच परिणाम आयपीएलच्या 13 व्या मोसमावर झाला आहे.
याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे की सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी म्हणून 15 एप्रिलपर्यंत आयपीएलचे सामने खेळवले जाणार नाहीत. त्याचबरोबर बीसीसीआयने म्हटले आहे की क्रिकेट चाहत्यांना तसेच आयपीएलशी संबंधित असणाऱ्या सर्वांना क्रिकेटचा सुरक्षितपणे आनंद घेता यावा यासाठी योग्य पावले उचलली जातील.
तसेच याबाबत बीसीसीआय सध्या भारतीय सरकार, क्रीडा मंत्रालय, आरोग्य मंत्रालय यांच्याशी संपर्कात आहेत.त्याआधी केंद्र सरकारने 13 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत राजनैतिक व नोकरी अशासारख्या काही श्रेणी वगळता सर्व परदेशी व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परदेशी खेळाडूंना 15 एप्रिलपर्यंत आयपीएलसाठी भारतात येता येणार नाही. खेळाडूंना बिजनेस व्हिसा मिळतो. यावर्षीच्या आयपीएलमध्ये 8 संघांचे एकूण 60 परदेशी खेळाडू खेळणार आहेत.त्यामुळे आता परदेशी खेळाडूंना 15 एप्रिलनंतर व्हिसा मिळाला तर आयपीएल यावर्षी खेळावली जाणार का हे पहावे लागेल.