जळगावात ट्रान्सफर स्टेशनसह आधुनिक अग्निशमन दुचाकींचे पालकमंत्र्यांच्याहस्ते लोकार्पण

घनकचरा व्यवस्थापन आणि आपत्कालीन सेवांना मिळणार बळ
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ट्रान्सफर स्टेशन प्रकल्पासह महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागासाठी आधुनिक अग्निशमन दुचाकींचे लोकार्पण गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) करण्यात आले. पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते डी-मार्टसमोरील शिवाजी उद्यान, टी.बी. हॉस्पिटल परिसरात हा सोहळा पार पडला.
या वेळी महापौर दीपमाला काळे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा), विधान परिषद सदस्य नंदकिशोर महाजन आणि सत्यजित तांबे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.
घनकचरा व्यवस्थापनाला मिळणार बळ
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत सिटी सॉलिड वेस्ट ॲक्शन प्लॅन (CSWAP) मधील मंजूर घटकानुसार ट्रान्सफर स्टेशन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेला मदत होणार आहे. या प्रकल्पाचे कंत्राट श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., जळगाव यांना देण्यात आले आहे.
आगीच्या घटनांवर नियंत्रणासाठी आधुनिक दुचाकी
महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागासाठी आधुनिक अग्निशमन दुचाकी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील अरुंद रस्ते आणि गर्दीच्या भागांत आपत्कालीन परिस्थितीत जलद पोहोचण्यासाठी या दुचाकी उपयुक्त ठरणार आहेत. आगीच्या घटनांमध्ये तातडीने घटनास्थळी पोहोचून प्राथमिक स्तरावर मदतकार्य सुरू करण्यासाठी या सुविधेमुळे अग्निशमन विभागाची कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे.
अधिकारी-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त आदित्य जिवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, शहर अभियंता राजेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, नगरसेविका रेखा पाटील, विक्रम सोनवणे, निकिता वंजारी आणि राजेंद्र घुगे-पाटील उपस्थित होते.
तसेच मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे, केंद्र अधिकारी भारत बारी यांच्यासह गिरीश खडके, देविदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण, अक्षय नाईक, अजय पाटील, वृषभ सुरवाडे, योगेश पाटील, सौरभ चिकटे, सत्तार तडवी, नितीन राठोड, रितेश उबाळे, शेख, केतन पाटील, सुमित साळवे, विनोद कोडपे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









