भुसावळ तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; १० गुन्हे दाखल

२६५ लिटर गावठी दारू आणि २,८०० लिटर रसायन जप्त; १ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव, प्रतिनिधी : भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) विशेष मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान विविध ठिकाणी छापे टाकून एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाईत २६५ लिटर गावठी दारू आणि २ हजार ८०० लिटर रसायन असा एकूण १ लाख ६६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती संकलित करून प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
दिपनगर दुरक्षेत्रांतर्गत पिंप्रीसेकम येथील अशोक धनसिंग तायडे (वय ५१) आणि फेकरी येथील वाल्मीकनगरातील रितेश प्रकाश सूर्यवंशी (वय २८) यांच्याविरुद्ध प्रत्येकी २० लिटर गावठी दारूसंदर्भात कारवाई करण्यात आली. दोन्ही प्रकरणांत प्रत्येकी २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कु-हा दुरक्षेत्रांतर्गत बेलव्हाय येथील निवृत्ती दगडू सोनवणे (वय ४५) याच्याकडून ३० लिटर, तर वराडसीम येथील विलास गोविंदा सपकाळे (वय ५८) याच्याकडून १५ लिटर गावठी दारू हस्तगत करण्यात आली. या दोन्ही कारवायांमध्ये अनुक्रमे ३ हजार आणि १ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
साकेगाव बीटमध्ये सागर मधुकर सोनवणे (वय ३०), भगवान भीमराव कोळी (वय ३८) आणि केशव माधव मराठे (वय ५०, सर्व रा. साकेगाव, ता. भुसावळ) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या तिन्ही प्रकरणांत प्रत्येकी ३० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. प्रत्येक प्रकरणातील जप्त मुद्देमालाची किंमत ३ हजार रुपये आहे.
किन्ही परिसरातील कारवाईत कन्हाळा येथील उस्मान हसन गवळी (वय ४९), खलील हसन गवळी (वय ३९) आणि युनुस हसन गवळी (वय ४३) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत अनुक्रमे ८००, १ हजार ६०० आणि ४०० लिटर रसायन जप्त करण्यात आले. या तिन्ही प्रकरणांतील मुद्देमालाची किंमत अनुक्रमे ४३ हजार, ८३ हजार आणि २३ हजार रुपये आहे.
जिल्ह्यात कुठेही अवैध दारूची निर्मिती, विक्री किंवा वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. मोहिमेत वाल्मिक सोनवणे, सुभान तडवी, विकास बाविस्कर, सुधीर विसपुते, ईस्तीयाक शेख, हेमंत मिटकर, रशीद तडवी, सुभाष सोनवणे, सचिन पारधी, न्यायाजोद्दीन तडवी, किरण तायडे, जगदीश भोई आणि लीना लोखंडे यांनी सहभाग घेतला.








