रावेर तालुक्यातील तापी नदी पात्राजवळील घटना
रावेर (प्रतिनिधी) :- सावदा येथून मुक्ताईनगरला जात असताना वाटेत मुलीने पित्याला दुचाकी थांबवायला सांगितली. यावेळी ती तापी नदीच्या पात्रातील पूलाकडे मोबाईलवर सेल्फी काढण्यास गेली. त्याचवेळी पितादेखील बाजूला बाथरूमला गेला. तेवढ्यात मुलगी बेपत्ता झाल्याची घटना रावेर तालुक्यातून उघड झाली आहे. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला २० वर्षीय तरुणी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
अनंत लक्ष्मण कुलकर्णी (वय ४६, रा. सावदा) यांनी खबर दिली आहे. ते त्यांची मुलगी वैष्णवी अनंत कुलकर्णी (वय २०) हिच्यासह मुक्ताईनगर येथे दुचाकीने जात होते. नंतर दुचाकी हतनूर धरणाजवळ लुमखेडा गावाजवळ तापी नदीजवळ आली असता तेथे वैष्णवीने दुचाकी थांबविण्यासाठी सांगितली. दुचाकीवरून उतरून तापीनदीच्या पात्रातील पुलाखाली मोबाईल वर सेल्फी काढण्यासाठी गेली. तेव्हा वैष्णवीचे पिता अनंत हे बाथरूमसाठी बाजूला गेले. नंतर येऊन पाहिले तर वैष्णवी कुठे दिसली नाही. त्यांनी शोधाशोध केली मात्र मिळून आली नाही.
अखेर पित्याने सावदा पोलीस स्टेशन गाठून हरविल्याची खबर दिली. त्यानुसार पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.