जळगाव जिल्ह्यातील संशयित आरोपींचा नाशिक जिल्ह्यात कारनामा
जळगाव (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका अल्पवयीन मतिमंद मुलीला एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे एका व्यक्तीला एक लाख रुपयात विकल्याचे उघड झाले आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार झाले असून खरेदी-विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून नाशिक जिल्ह्यातील घोटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यात कासोदा येथील रहिवासी असलेली व नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील परदेशीवाडी येथील माहेर असलेली महिला सुरेखा योगेश पाटील (वय ३२) हिची करवंदे खरेदी करताना एका अल्पवयीन गतिमंद मुलीशी ओळख झाली. त्यानंतर या महिलेने पती योगेश शांताराम पाटील (वय ३५, रा. कासोदा, ता. एरंडोल) च्या संगनमताने मुलीला फूस लावून घोटी येथून जळगाव जिल्ह्यात नेले. जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे तिसरा संशयित आरोपी मनोज राजू शिंपी यास एक लाख रुपयात विक्री करुन घरात लग्न लावून दिले. त्यानंतर या मुलीवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार करण्यात आले.
दुसरीकडे पीडित मुलगी बेपत्ता झाल्यानंतर इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्यात पालकांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी गुप्त माहितीद्वारे सदर मुलीचा शोध घेऊन दोन्ही संशयित आरोपी दाम्पत्याला अटक केली. गतिमंद असलेल्या मुलीला घराचा पत्ता सांगता येत नसल्याने तिच्यावर महिनाभर अत्याचार झाला. नीट बोलता येत नसल्याने तिला मदतीला कुणालाही बोलावता येत नसल्याचेही समोर आले आहे. तसेच, तिसरा संशयित आरोपी मनोज राजू शिंपी (वय ३१) यालाही तपासाधिकारी पीएसआय कवडे व सहकाऱ्यांनी सोमवारी रात्री अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून संशयित आरोपींविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी घोटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.