जळगावातील आकाशवाणी चौकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील आकाशवाणी चौकातील उड्डाणपुलाजनजीक ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी ११ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, रामानंद नगर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती.
स्वप्निल सुरेश जोशी (वय-३५) रा. देवीदास कॉलनी, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. शहरातील देवीदास कॉलनी परिसरात स्वप्निल जोशी हा तरूण आई स्मीता, वडील, पत्नी समिधा, मुलगा वेद (वर्ष-४), मुलगी समिक्षा आणि भाऊ यांच्यासह राहत होता. प्रेम नगरात त्याचे किराणा दुकान होते. मंगळवारी ११ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्वप्निल जोशी हा तरूण त्याची दुचाकी (एमएच १९ बीएस ४१३) ने इच्छादेवी चौकाकडून आकाशवाणी चौकातून जात होता. त्यावेळी उड्डाण पुलानजीक मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर क्रमांक (एमएच १९ सीवाय ५७८८) ने ओव्हरटेक करत असतांना दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत स्वप्निलच्या डोक्याला डंपरचा फटका बसल्याचे जागीच ठार झाला. ही घटना घडल्यानंतर वाहन चालक हा डंपर सोडून पसार झाला होता. आकाशवाणी चौकात वाहतूक शाखेचे गस्तीवर असलेले पोहेकॉ हर्षद गवळी आणि चालक दिपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. रामानंद नगर पोलीसांनी डंपर ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान मयत तरूण हा पोलीस अधिक्षक कार्यालयात सेवानिवृत्त कार्यालय अधिक्षक सुरेश जोशी यांचा मुलगा आहे. त्यांच्या पश्चात यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती.