मुक्ताईनगर ( प्रतिनिधी) – भावाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी नाते तोडल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने, एका विवाहितेच्या घरात घुसून तिला चापटबुक्क्यांनी मारहाण करत कपाटातील तब्बल ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर येथील मुक्ताई कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात बुलढाणा जिल्ह्यातील चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*काय आहे नेमकी घटना?*
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथील बोदवड रोडवरील दिपाली हॉटेल परिसरात राहणाऱ्या सौ. निता शिवराज पाटील (वय ४२, व्यवसाय: घरकाम) यांचा मोठा भाऊ अनंता शिवाजी येळवंडे याची पत्नी सौ. पूजा उर्फ आशा हिने इतर नातेवाईकांना ‘निता पाटील यांच्याशी कोणीही नाते ठेवायचे नाही’ असे सांगितले होते. या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी निता पाटील यांनी विचारणा केली होती, ज्याचा राग संशयित आरोपींना आला होता.
याच रागातून २१ जून २०२६ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मुक्ताई कॉलनीतील निता पाटील यांच्या राहत्या घरी आरोपींनी संगनमत करून प्रवेश केला. त्यांनी निता पाटील यांना बेदम चापटबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्याchar मारहाणीवरच न थांबता संशयितांनी घरातील कपाटात ठेवलेले २ लाख रुपये रोख (५०० रुपयांच्या ४०० नोटा) आणि १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या ४५ ग्रॅम सोन्याच्या ४ बांगड्या असा एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला.
*चार जणांवर गुन्हा दाखल*
याप्रकरणी पीडित महिला सौ. निता पाटील यांनी २२ जून रोजी रात्री मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी:
अनंता शिवाजी येळवंडे,सौ. पूजा उर्फ आशा अनंता येळवंडे, भगवान श्रीकृष्ण येळवंडे, रमेश श्रीकृष्ण येळवंडे (सर्व रा. मंगरूळ नवघरे, ता. चिखली, जि. बुलढाणा)
यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११९(१), ३२९(४), ११५(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक सुरेश मेढे करत आहेत.










