खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अटकेत ; जामनेर तालुक्यातील मोयखेडा येथिल घटना
जामनेर (प्रतिनिधी) :- बहिणीला घरी घेऊन जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीने हल्ला करून त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत केल्याची घटना जामनेर तालुक्यातील मोयखेडा येथे घडली. याप्रकरणी फत्तेपूर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता फिर्यादीच्या घरासमोरील सार्वजनिक ठिकाणी हा प्रकार घडला. फिर्यादीच्या बहिणीला घरी घेऊन जाण्याच्या कारणावरून आरोपीने चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर फिर्यादीची बहीण फिर्यादीला बोलविण्यासाठी खोलीकडे येत असताना आरोपीचा राग अनावर झाला.
आरोपीने घरातील कोपऱ्यातील लोखंडी कुऱ्हाड हातात घेतली. त्यानंतर फिर्यादीच्या बहिणीच्या मागे जोरात धावत जाऊन तिच्या डोक्यात मागून कुऱ्हाडीने वार केला.
या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून फत्तेपूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २१५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ११५(२), ३५२ व ३५१(२) प्रमाणे खुनाचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी रविंद्र बारकु पवार, रा. मोयखेडा तांडा, ता. जामनेर याला २ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी अटक करण्यात आली. पुढील तपास फत्तेपूर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.









