३९ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र; पनवेल येथे मोफत उपचारासाठी रवाना
अमळनेर ( प्रतिनिधी ) – येथील मंगळग्रह सेवा संस्था, मा. ना. गुलाबराव पाटील सोशल फाऊंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाऊंडेशन (धनवाडी) आणि आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २१ जून) आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

समाजातील गरजू व ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार नेत्र आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला. शिबिरादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. विजय बामणे, डॉ. गुरुप्रीत सिंग, डॉ. राहुल पाटील आणि डॉ. भूपेंद्र वाघ यांनी निशा शिंदे व प्राची गायकवाड यांच्या सहकार्याने नागरिकांची सखोल नेत्र तपासणी केली.
या शिबिरात एकूण ७३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३९ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. पात्र रुग्णांची आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी रुग्णांच्या हस्ते उपस्थित नेत्रतज्ज्ञांचा सन्मानही करण्यात आला.
मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्व रुग्णांना पनवेल येथे मोफत उपचारासाठी पाठविण्याची विशेष वाहन व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी साडेचार वाजता हे सर्व रुग्ण श्री मंगळग्रह मंदिर परिसरातून पनवेलकडे रवाना झाले. शस्त्रक्रियेसह आवश्यक वैद्यकीय सुविधा व पुढील उपचारांची व्यवस्था संबंधित रुग्णालयामार्फत करण्यात येणार आहे.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, सेवेकरी तसेच वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले. उपस्थित नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
समाजातील दुर्बल आणि गरजू घटकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्था सातत्याने कार्यरत असून, दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते. भविष्यातही विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम आणि खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी दिली.









