बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के यांची पत्रपरिषदेत माहिती
शाखांना क्रियाशील बनविण्यासाठी राज्यभर दौरे सुरु
जळगाव (प्रतिनिधी) : मुलांना मोबाईल, गॅझेट पासून लांब करण्यासाठी व त्यांना रंगभूमीकडे वळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आम्ही राज्यभर बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून शाखांचे दौरे करीत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत. आगामी काळात मुलांना सामाजिकदृष्ट्यादेखील कार्यशील बनवून रंगभूमीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष तथा अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांनी शुक्रवारी दिनांक ७ जून रोजी पत्रकार परिषदेत दिली.
बालरंगभूमी परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांची नुकतीच निवड झाली आहे. परिषदेच्या राज्यात २५ शाखा आहेत. परिषदेतर्फे राज्यभर शाखांशी संवाद साधण्यासाठी अध्यक्ष शिर्के सामंत यांनी दौरे सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून खान्देशात त्या जळगाव शहरात आल्या होत्या. दुपारी शाखांशी बैठक झाल्यावर संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत बाल रंगभूमी परिषदेची भूमिका मांडली. आगामी काळात करायचे नियोजन याविषयी त्यांनी माहिती सांगितली.
लहान मुले मोबाईलप्रेमी झाली असून त्यामुळे त्यांची बौद्धिक वाढ कमी होत आहे. त्याकरिता त्यांना रंगभूमीकडे वळविण्याकरिता विविध स्पर्धा, महोत्सव घेतले जाणार आहेत. यात सामाजिक, कृषी, विषयदेखील विद्यार्थ्यांना उपक्रमात दिले जाणार आहे. दिव्यांग, बालसुधारगृह मधील मुलांना देखील आम्ही सहभागी करून घेत आहोत. विविध नाट्यस्पर्धांत मुलांना केवळ अभिनयच नाही तर मेकअप, नेपथ्य, संहिता लेखन आदी भूमिका शिकविणार आहोत. स्पर्धेसाठी उत्स्फूर्त विषय देणार आहोत. डिसेंबरमध्ये बालरंगभूमी संमेलन आयोजित केले जाणार असल्याची माहिती नीलम शिर्के यांनी दिली आहे.
मुलांचे व पालकांचे ‘बॉण्डिंग’ चांगले व संवादी राहावे यासाठी आपण मार्गदर्शन करणार आहोत. मुलांना संवादी बनविणेकरीत शाखा प्रयत्न करणार आहे. घरात आलेल्या पाहुण्यांशी मुलं बोलत नाही. मुलांना केवळ सुट्टयांपुरता उपक्रम घेण्यासाठी मर्यादित न ठेवता शालेय कालावधीत देखील कार्यशील ठेवण्याकरिता बाल रंगभूमी परिषदेच्या शाखांनी प्रयत्न करण्यासाठी सूचना दिल्या आहेत, असेहि शिर्के सामंत म्हणाल्या. पत्रकार परिषदेत जिल्हा अध्यक्ष योगेश शुक्ल, विनोद ढगे आदी उपस्थित होते.