कमी वजनाच्या जुळ्या नवजात शिशुंवर डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार
जळगाव (प्रतिनिधी) :- एका आईच्या डोळ्यातील अश्रू, वडिलांच्या चेहर्यावरची चिंता आणि दोन चिमुकल्या जीवांसाठी सुरू असलेली मृत्यूशी झुंज मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी अखेर या संघर्षाला यश मिळाले आणि दोन निष्पाप जीवांना नवजीवन प्राप्त झाले.
पवन पाटील यांच्या पत्नीने जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर कुटुंबाचा आनंद क्षणात चिंतेत बदलला. जन्मत:च दोन्ही बाळांचे वजन अत्यंत कमी होते. त्यांना व्यवस्थित दूध पिता येत नव्हते. काही दिवसांतच दोघांनाही गंभीर सेप्सीसचा संसर्ग झाला. अंग पिवळे पडल्याने कावीळची लक्षणे वाढू लागली आणि प्रकृती अधिकच खालावत गेली. प्रत्येक क्षण कुटुंबासाठी काळजाचा ठोका चुकवणारा ठरत होता.अखेर आशेचा किरण म्हणून दोन्ही बाळांना डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाच्या अत्याधुनिक एनआयसीयू विभागात दाखल करण्यात आले. नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीरवार यांनी परिस्थितीची गांभीर्य ओळखून तातडीने व्हेंटिलेटरच्या सहाय्याने उपचार सुरू केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कुशल धांडे, डॉ. विशाल कोठावदे, डॉ. अस्मिता गायकवाड, डॉ. सृष्टी भिरूड तसेच संपूर्ण नर्सिंग स्टाफने दिवस-रात्र एक करत या दोन चिमुकल्यांसाठी प्रयत्न सुरू ठेवले. एनआयसीयूतील प्रत्येक क्षण आव्हानात्मक होता. कधी ऑक्सिजनची पातळी कमी होत होती, तर कधी संसर्ग वाढत होता. मात्र डॉक्टरांनी हार मानली नाही. फोटोथेरपी, औषधोपचार, संसर्ग नियंत्रण आणि विशेष पोषण व्यवस्थापनाच्या माध्यमातून उपचार सुरू ठेवण्यात आले. अनुभवी नर्सिंग स्टाफने २४ तास आईसारखी माया देत बाळांची काळजी घेतली.काही दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही बाळांनी उपचारांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. त्यांचे वजन वाढू लागले, त्यांनी दूध पिण्यास सुरुवात केली आणि हळूहळू प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. अखेर डॉक्टरांनी दोन्ही बाळांना सुरक्षितपणे डिस्चार्ज दिल्यानंतर आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
आमच्या बाळांना नवजीवन मिळाले, हे आमच्यासाठी देवाने दिलेले वरदान आहे. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने आमच्यासाठी देवदूतासारखे काम केले, अशी भावनिक प्रतिक्रिया बाळांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
कमी वजनाच्या आणि गंभीर संसर्ग झालेल्या नवजात शिशुंवर उपचार करणे हे मोठे आव्हान असते. मात्र वेळेवर उपचार, आधुनिक सुविधा आणि टीमवर्कच्या बळावर आम्ही या दोन्ही बाळांना नवजीवन देऊ शकलो, असे डॉ. कुशल धांडे यांनी सांगितले.










