जळगाव एलसीबीची कामगिरी
एरंडोल ( प्रतिनिधी ) – एरंडोल शहरातील शेतकी संघाच्या कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या दोन संशयित आरोपींना रविवारी ९ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांकडून चोरीचे ९ मोबाईल हस्तगत केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती वरून, एरंडोल शहरातील शेतकी संघा कॉम्प्लेक्समधील हरिओम इंटरप्राईजेस नावाचे मोबाईल दुकान आहे. हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातून मोबाईल चोरल्याची घटना घडली होती. या संदर्भात एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, संदीप सावळे, महेश महाजन, पोलीस नाईक नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील, लोकेश माळी, महिला पोलीस नाईक उपाली खरे, भरत पाटील, प्रमोद ठाकूर यांचे पथक रविवार ९ जुलै रोजी दुपारी रवाना झाले. त्यानुसार संशयित आरोपी टिकाराम कोमल मोरे (वय-२८) रा. एरंडोल आणि पंकज मंगल वाघ (वय-३०) रा. हिंगोना ता. धरणगाव यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे एकूण ९ मोबाईल हस्तगत केले आहे. यातील एक संशयित आरोपी प्रवीण बागुल हा पोलिसांना पाहून पसार झाला आहे. पुढील कारवाईसाठी दोन्ही अटकेतील संशयीतांना एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल करीत आहे.