तरुणांच्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसची परिषद
पुण्यात शेकडो तरुणांची उपस्थिती
पुणे (प्रतिनिधी) – तरुणांना प्रेमाविषयी प्रचंड आकर्षण आहे. मात्र प्रेम, आकर्षण, वासना, संभोग विविध संकल्पनांविषयी तरुण वर्गात गोंधळ असून महाविद्यालयांमध्ये “वयात येताना” आणि शास्त्रीय लैंगिक शिक्षणाचे मार्गदर्शन करणाऱ्या कार्यक्रमांची गरज आहे. प्रेम हे मुरांबा असून आकर्षण हे फास्टफूड आहे. त्यामुळे तरुण वर्गाला प्रेमाविषयी शिक्षित करणे पालक, शिक्षकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जेष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉ. अनिल डोंगरे यांनी व्यक्त केले.
“प्रेम व हिंसा : युवा संवाद” ही परिषद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महिला सहभाग, युवा सहभाग व जोडीदाराची विवेकी निवड या तीन विभागाच्या पुढाकाराने व पुणे जिल्हा शाखेच्या सहकार्याने यांनी आयोजितकरण्यात आली होती. यावेळी मंचावर अध्यक्षपदी अंनिसचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बीजभाषक राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, तिघी वक्ते ऍड. रमा सरोदे, डॉ. अनिल डोंगरे, महिला विभाग कार्यवाह आरती नाईक, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सम्यक वि. म. उपस्थित होते. सुरुवातीला हर्षल जाधव यांनी प्रस्तावनेतून परिषदेविषयी माहिती देऊन उद्देश विशद केला.
यानंतर माधव बावगे यांनी बीजभाषणात, पुण्यात घडलेल्या हिंसक घटनेबद्दल खेद व्यक्त करून, विद्यार्थ्यांना प्रेम या विषयावर प्रशिक्षण दिले जाण्याची गरज असून उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच विशेष विवाह कायद्यात बदल व्हावा याकरिता अंनिस पाठपुरावा करीत आहे. अंनिस परिचयोत्तर विवाहाचा आग्रह धरते. समितीने ५००च्या वर आंतरजातीय, आंतरधर्मीय, सत्यशोधकी विवाह लावले आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. अनिल डोंगरे यांनी, प्रेम व आकर्षण यात फरक समजावून सांगितला. तसेच, हिंसेला नकार देणारे गाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तर ऍड. रमा सरोदे यांनी, कायद्याच्या अनुषंगाने मांडणी केली. माणसांच्या वर्तनात बदल झाला पाहिजे, तरुणांनी सजग राहावे. प्रेम तुमच्या आवडीने झाले पाहिजे. त्याला विवेकी विचारांची जोड असलीच पाहिजे. तेव्हा त्यात गोडवा निर्माण होतो आणि एकमेकांच्या भावनांचा आदर केला जातो असेही त्या म्हणाल्या.
आरती नाईक यांनी, प्रेम आणि हिंसा यावर मांडणी करून, मानवी मूल्यांचा जागर करून हिंसेला विरोध केलं पाहिजे असे सांगितले. प्रेमाच्या व्याख्या न समजल्यामुळे तरुणाईत गोंधळ उडाला आहे. त्यामुळे या विषयावर काम करण्याची गरज आहे. मुलांबरोबर पालक, शिक्षकांनी संवाद वाढविला पाहिजे. दरडवण्यापेक्षा समजावण्याकडे कल हवा, असेही आरती नाईक म्हणाल्या. लेशपाल जवळगे यानेही, समाजाने स्वतःमध्ये बदल केला पाहिजे . हिंसक कृतींना समाजातील विकृती जबाबदार असते असे सांगून हिंसक घटनेत पुढे येऊन वाचविण्याची भूमिका ठेवली पाहिजे, असे म्हणाला.
अध्यक्षीय भाषणात बनसोडे म्हणाले कि, देशात प्रेमापेक्षा हिंसेचे वातावरण वाढण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे कि काय असे दिसत आहे. मात्र हिंसेपेक्षा कधीही प्रेम सुंदर असते. व प्रेम नेहमीच जिंकते. तरुणाईने प्रेमासाठी आधी व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे, असे सांगितले. विशाल विमल यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. शाम येणगे यांनी आभार मानले. तर्कशील सोसायटीचे सुभाषचंद्र सैनी उपस्थित होते. परिषदेत ७ ठराव मांडले जाऊन ते मंजूर करण्यात आले.
मयूर पटारे, ऍड. परिक्रमा खोत, अरिहंत अनामिका, माधुरी गायकवाड यांनी गाणी सादर केली. जिल्हा प्रधान सचिव संजय बारी, विनोद लातूरकर, स्वप्नील भोसले, मनोज बोरसे, वनिता फाळके, श्वेता सूर्यवंशी, रविकिरण काटकर, नितीन पाटील, कविता धोत्रे, अनुष्का कावले यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. परिषदेसाठी प्रियांका खेडेकर, उदय कदम, डॉ. ठाकसेन गोराणे, सुधाकर काशीद, श्रीनिवास शिंदे, अक्षय दावडीकर, मृणालिनी पवार, महेश गुरव, जुनेद सैय्यद, प्रतीक कालेकर, किर्तीवर्धन तायडे, एकनाथ पाठक, संदीप कांबळे, सदाशिव फाळके यांचे सहकार्य लाभले.
युवा परिषदेमध्ये मांडण्यात आलेले ठराव
(१) प्रेम ही अत्युच्च दर्जाची मानवी भावना आहे. त्यात हिंसेला थारा नाही. कोणत्याही पातळीवरच्या हिंसेचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही स्वतः हिंसक वर्तन करणार नाही, हिंसेचे समर्थन करणार नाही. हिंसा घडत असल्यास रोखण्याचा प्रयत्न करु.
(२) कांही वेळा तरुणांमध्ये प्रेमातून घडणाऱ्या हिंसक घटनांचे मूळ कारण प्रेम, आकर्षक आणि वासना या तीन भावनांमधील गोंधळ हे आहे. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात शास्त्रशुद्ध लैंगिक शिक्षण व समुपदेशनचा समावेश करण्यात यावा अशी आग्रही मागणी या परिषदेत करीत आम्ही करीत आहोत.
(३) प्रेम प्रकरणातून होणाऱ्या हिंसेच्या बहुतेक घटनांमध्ये बळी ही स्त्रीच असते. या मागे असलेली पुरुषी वर्चस्वाची व स्वामीत्वाची मानसिकता बदलून स्री – पुरुष समानतेचे मूल्य रुजविणे, त्या योगे माणूस म्हणून स्वीकार आणि परस्परांच्या मताचा आदर या साठी विविध उपक्रमांद्वारे तरुणाईचे प्रबोधन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
(४) स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी लव्ह जिहाद सारखे भ्रम तयार करून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे व त्यातून हिंसा घडवून आणण्याच्या विकृत मानसिकतेचा आम्ही जाहीर निषेध करतो. प्रेम हे जात – धर्म – भाषा – प्रांत निरपेक्ष मानवी मूल्य आहे. त्यात वरील संकूचित बाबींना थारा नाही. त्यामुळे लव्ह जिहाद सारख्या भ्रम आणि अफवांना आम्ही बळी पडणार नाही.
(५) महिलावरील हल्ले,बलात्कार, अन्य अत्याचाराबाबत गांभीर्याने दखल घेऊन,ती प्रकरणे जलद गती न्यायलायात चालवून, अशा प्रकरणातील आरोपींना तातडीने कठोर शिक्षा झाली पाहिजे.
६) महाविद्यालय स्तरावर प्रेम,आणि लैंगिक शिक्षण या बाबत युवक युवतींचा संवाद शाळा घेण्याचे नियोजन महाराष्ट्र अं.नि स करणार आहे.
७) शाळा,महाविद्यालये,शिकवण्या,बस स्टँड अशा ठिकाणी पोलिसांचा गस्त वाढविला पाहिजे.