मेहुणबारे येथे घरफोडी; १ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास


चाळीसगाव | प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खेडगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याच्या बांगड्या असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडगाव येथील व्यावसायिक जितेंद्र बारीकराव साळुंखे (वय ५०) हे २ ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास घरी परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घरातील कपाटात ठेवलेली १ लाख रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या दोन तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, असा एकूण अंदाजे १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी जितेंद्र साळुंखे यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. २२४/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. प्रशांत पाटील करीत आहेत.









