२००६ च्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील मूळ अभिलेख चोरीला; शहर पोलीस ठाण्यात BNS कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव महानगरपालिकेच्या नगर रचनाकार विभागातील रेकॉर्ड रूममधून २००६ सालच्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या मूळ फाईली रहस्यमयरीत्या गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात BNS कलम ३०३(२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


फिर्यादी अमोल वसंतराव पाटील (वय ३२) हे जळगाव महानगरपालिकेच्या नगर रचनाकार विभागात नगर रचनाकार तथा प्रभारी सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नगर रचनाकार विभागातील अभिलेख रेकॉर्ड रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येतात. त्यामध्ये सन २००६ मधील घरकुल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित गट क्र. ३३७/३ अ/१ व गट क्र. ३३७/३ अ/२ यांच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या मूळ फाईली सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या.
न्यायालयीन कामकाजासाठी मागविल्या, मात्र फाईलीच गायब
दि. ३१ जानेवारी २०२४ पासून न्यायालयीन कामकाजासाठी संबंधित फाईली वारंवार मागविण्यात आल्या. मात्र त्या उपलब्ध न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संपूर्ण अभिलेख विभागात सखोल शोध घेण्यात आला. तरीदेखील संबंधित फाईली सापडल्या नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.
अज्ञात व्यक्तीने फाईली चोरल्याचा संशय
दि. ३१ जानेवारी २०२४ ते २ जुलै २०२६ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने रेकॉर्ड रूममध्ये प्रवेश करून विनापरवानगी संबंधित मूळ फाईली चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अमोल पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महत्त्वाच्या अभिलेखांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूममधून न्यायालयीन कामकाजाशी संबंधित महत्त्वाचे मूळ अभिलेख गायब झाल्याने प्रशासनातील अभिलेख सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या फाईली नेमक्या कशा गायब झाल्या, त्या चोरीला गेल्या की त्यामागे अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.









