नारायण मंदिराच्या ट्रस्टची फसवणूक; तिघांविरुद्ध जळगाव तालुका पोलिसांत गुन्हा
जळगाव ( प्रतिनिधी ) – नारायण मंदिराच्या कमानी व इतर बांधकामासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेल्या रकमेतून १ कोटी २६ लाख २५ हजार ५०० रुपये परत न करता विश्वासघात केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद वासुदेव झांबरे (वय ६९, व्यवसाय ट्रॅव्हल्स, रा. श्रीगणनगर कॉलनी, महाबळ, जळगाव) यांनी नारायण मंदिर, जळगाव येथील ट्रस्टच्या वतीने मंदिराच्या कमानी तसेच इतर बांधकामासाठी संबंधित व्यक्तींना वेळोवेळी रक्कम दिली होती.
तक्रारीनुसार, आरोपी नंदिशभाई मनहरभाई सोमपुरा, किशनभाई मनहरभाई सोमपुरा आणि मनहरभाई प्रभाशंकर सोमपुरा यांनी संगनमत करून मंदिराच्या कमानी व इतर बांधकामाची कामे पूर्ण करण्याचे सांगून ट्रस्टच्या वतीने एकूण ३ कोटी २४ लाख ५०० रुपये घेतले. मात्र, संबंधित कामे पूर्ण करण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादीने मंदिराच्या बांधकामासाठी दिलेल्या बिलांची पाहणी केली असता, प्रत्यक्ष कामापेक्षा १ कोटी २६ लाख २५ हजार ५०० रुपये अधिक घेतल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप आहे. ही रक्कम स्वतःकडे ठेवून घेतल्यानंतर ती परत मागितली असता आरोपींनी स्पष्ट नकार दिल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१६(५), ३(५) प्रमाणे विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.२३ वाजता करण्यात आली. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील हे पुढील तपास करीत असून, तक्रारीनुसार अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.









