वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ
जळगाव ( प्रतिनिधी ) –प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने वीजग्राहकांना अधिक वेगवान आणि सुलभ सेवा देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात महावितरणकडून विशेष सेवा कक्ष उभारून येत्या १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे.


मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणकडून या दोन्ही अभियानाला गुरुवार (दि. १७ सप्टेंबर) पासून प्रारंभ झाला. संचालक श्री. धनंजय औंढेकर (संचालन) व श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अभियानाच्या अंमलबजावणीचा मंगळवारी (दि. २२) आढावा घेतला व हे अभियान आणखी गतीमान करण्याची सूचना केली. यावेळी कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्री. परेश भागवत यांनी अभियानाची सविस्तर माहिती दिली. या बैठकीला कार्यकारी संचालक श्री. भुजंग खंदारे, श्री. अंकुर कावळे, श्री. सुनील काकडे, श्री. संदीप पाटील, श्री. चंद्रमणी मिश्रा यांच्यासह राज्यातील मुख्य अभियंते व अधीक्षक अभियंते उपस्थित होते. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येकी दोन उत्कृष्ट मंडलांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
सेवा संकल्प अभियान अंतर्गत प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष सुरु करण्यात आले आहेत. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या अंतर्गत जागेवरच ऑनलाईन अर्ज नोंदणी, योजनेचे आर्थिक फायदे व सौर संच बसविण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, कर्जाची सुविधा, अंदाजित खर्च यासाठी स्थानिक बँक प्रतिनिधी आणि निवडसूचीवरील सौर कंत्राटदार प्रतिनिधींशी थेट संपर्क व समन्वय करण्यात येत आहे. कर्जाची देखील सुविधा उपलब्ध होत आहे. यासह सौर योजनांची माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच त्रुटींची पुर्तता करून प्रलंबित अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्यात येत आहे.
या सेवा सेतू अभियानात नवीन घरगुती वीजजोडणी देणे, नादुरुस्त रोहित्र विनाविलंब बदलून देणे, वीज बिलावरील नावात बदल करणे, मंजूर भार बदलणे, बिलिंगविषयक तक्रारींचे निवारण करणे, प्रलंबित तक्रारींचे निवारण तसेच विद्युत सुरक्षेसाठी वीज यंत्रणेमध्ये आवश्यकतेनुसार स्पेसर बसवणे, इतर तांत्रिक उपाययोजना, वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती आदींना वेग देण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले. सेवा सेतू व सेवा संकल्प अभियानात एकाच छत्राखाली उपलब्ध सर्व सेवा व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.









