भुसावळ विभागाने केली २७० मुलांची सुटका
जळगाव (प्रतिनिधी) :- मध्य रेल्वेने “ऑपरेशन नन्हे फरिश्ते”: अंतर्गत रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान ९५८ मुलांची सुटका करण्यात आली. जानेवारी २०२४ मध्ये ५६ मुलांची सुटका करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत मुलांना गैरप्रकारांपासून वाचवण्याची जबाबदारीही ते योग्य पध्दतीने पार पाडत आहे.
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने “ऑपरेशन नन्हे फरिश्ते”अंतर्गत एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ६५५ मुले आणि ३०३ मुलींसह ९५८ मुलांची मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन फलाटांवरून सुटका केली आहे. यामध्ये चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्या बालकांचे त्यांच्या पालकांशी पुनर्भेट घडवून आणली.
काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे अथवा उच्च चांगल्या जीवन पध्दती किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांच्या निदर्शनास येत असतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतात.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक २८९ मुलांची सुटका केली असून त्यात १७५ मुले आणि ११४ मुलींचा समावेश आहे. भुसावळ विभागाने २७० मुलांची सुटका केली त्यात १६९ मुले आणि १०१ मुलींचा समावेश आहे. पुणे विभागाने २०६ मुलांची सुटका केली असून त्यात १९८ मुले आणि ८ मुलींचा समावेश आहे.
नागपूर विभागाने १३२ मुलांची सुटका केली असून त्यात ७६ मुले आणि ५६ मुलींचा समावेश आहे. सोलापूर विभागाने ६१ मुलांची सुटका केली असून त्यात ३७ मुले आणि २४ मुलींचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या आरपीएफने जानेवारी २०२४ मध्ये ३५ मुले आणि २१ मुलींसह ५६ मुलांची सुटका केली आहे. त्यापैकी एकट्या मुंबई विभागात २७ मुलांची सुटका करण्यात आली आहे.