अमळनेर तालुक्यातील खर्द येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील गलवाडे गावाच्याजवळ असलेल्या वळणावर दुचाकीचा ताबा सुटल्याने खोल चारीत पडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रवीण नाना पाटील (वय-४४, रा. खर्द ता. अमळनेर ह.मु. तांबेपुरा अमळनेर) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्रविण नाना पाटील हे अमळनेर शहरातील तांबेपुरा येथे वास्तव्याला होते. पानटपरी चालवून ते आपला उदरनिर्वाह करत होते. कामाच्या निमित्ताने ते त्यांच्या मुळ गावी खर्द येथे दुचाकीने मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी गेले. होते. काम आटोपून खर्द येथून अमळनेर येथे जाण्यासाठी दुचाकीने जात असताना रात्री ९.३० वाजेच्या सुमारास गलवाडे गावाजवळील वळणावर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे प्रविण पाटील हे दुचाकीसह रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल चारीत पडले.
त्यात त्यांच्या डोक्याला दगडाचा मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता घटना उघडकीला आली. दरम्यान रस्त्यावरील जाणाऱ्या येणाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर मारवाड पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी गाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. या घटनेबाबत मारवड पोलीस ठाण्यात दुपारी १२ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहे.