माढा (वृत्तसंथा) – काबाड कष्ट करुन शेतात घाम गाळ गाळणाऱ्या बळीराजाकडे असलेला कर्जाचा बोजा संपवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे जाहीर केले. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी माढा तालुक्यातील 9 हजार 355 शेतकरी पात्र ठरले. मात्र या कर्जमाफीत कर्जे न घेतलेल्या शेतकऱ्यांचीही कर्जे माफ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. माढा तालुक्यातील बेबळे गावतील शेतकऱ्यांसोबत हा प्रकार घडला. गावातील कर्ज न काढलेल्या 31 शेतकऱ्यांची कर्जे माफ झाले आहे. यामुळे हे शेतकरी आवाक झाले आहेत. अन्य गावात असा प्रकार घडला आहे का याबाबत चौकशी करण्याची गरज आहे. शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत असताना त्यांच्या नावावर दुसऱ्यांनीच काढलेली कर्जे माफ झाल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत. भुताष्टे गावातील शेतकऱ्याने तर थेट पोलिसांत तक्रार दिली असून जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
बेबळे गावातील 380 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. यातील 31 शेतकऱ्यांची महाराष्ट्र बँकेतून काढलेले कर्ज माफ झाल्याचे यादीतून समोर आले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी कधीच या बँकेत साधे खातेही काढले नसून बँक बघितली नसल्याचे सांगितल्याने हे कर्ज नेमकी कोणी काढली? कोणाच्या खात्यावर पैसे गेले आणि आता ही कर्जे माफ करून कोणाचा फायदा होणार? असा प्रश्न या प्रकरणातून उपस्थित झाला आहे. बेंबळे गावातील शेतकऱ्यांनी काढलेली कर्ज माफ होणे आवश्यक असताना न काढलेले कर्ज माफ झालीच कशी असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. साखर सम्राटांनी शेतकऱ्यांच्या नावावर काढलेली बोगस कर्जे फेडण्याचा प्रयत्न या कर्जमाफीतून होणार असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला होता. त्याचाच एक भाग म्हणुन बेबळे येथील प्रकार असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. माढ्यातील या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकाराविषयी महाराष्ट्र बँकेच्या निमगाव शाखेत उपस्थित बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.