संशयित आरोपीला २५ पर्यंत कोठडी
एलसीबी, तालुका पोलिसांचा २४ तासात यशस्वी तपास
जळगाव (प्रतिनिधी) : येथील आव्हाणा रस्त्यावर आढळून आलेल्या कामगार सुरेश सोळंकी खून प्रकरणी एलसीबीने कसून तपास करीत सदरहू घटना उघडकीस आणली आहे. सदर घटना ही अनैतिक संबंधावरून घडली असून महिलेच्या पतीने दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्याने सुरेश सोळंकीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याचे उघड झाले आहे.
घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता तरुणाचा मृतदेह पालथ्या अवस्थेत दिसून आला. मयत सुरेश सोलंकी हा पोलिसांच्या दृष्टीने सुरुवातीला अनोळखी होता. मयत सुरेश सोलंकी याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जबर वार केल्याचे देखील दिसत होते. मृतदेहापासून जवळच एका महिलेचे मंगळसुत्र आणि पायातील पैंजण आढळून आले. याशिवाय एक विस रुपयांचे नाणे देखील आढळून आले. पोलिसांनी या सर्व वस्तू तपासकामी ताब्यात घेत पुढील तपासाला सुरुवात केली. ज्याअर्थी घटनास्थळी महिलेचे मंगळसुत्र आणि पायातील पैंजण आढळून आले त्याअर्थी घटनेच्या वेळी व ठिकाणी एक महिला हजर होती हे स्पष्ट झाले.
गुन्ह्याचा पुढील समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा व त्यांच्या सहका-यांनी सुरु केला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांसह श्वानपथकाची मदत घेण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले. त्यात काही संशयास्पद फुटेज आढळून आले. घटनास्थळावर आढळून आलेले महिलेचे पायातील पैंजण परिसरातील लोकांना दाखवले असता अशा प्रकारचे बाजारात रस्त्यावर मिळणारे नकली मंगळसुत्र आणि पैंजण पावरा समाजाच्या महिला वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जिनींग परिसरातील पावरा समाजाच्या मजुर महिलांची सखोल चौकशी करण्यात आली.
पैंजण आणि मंगळसुत्र हे परिसरात राहणा-या एका मजूर महिलेचे असल्याची माहिती मिळाली. महिला पोलिसांच्या मदतीने तिची सखोल चौकशी केली असता तिने सर्व घटनाक्रम कथन केला. सदर महिलेचा पती व संशयित आरोपी रामलाल बारेला याने खून केल्याचे निष्पन्न झाले. सदर महिला अर्थात रामलालची पत्नी हिचे मयत सुरेश सोलंकी या अविवाहीत तरुणासोबत सुत जुळले होते. घटनेच्या दिवशी घटनास्थळावर ती मयत सुरेश सोलंकी यास भेटण्यासाठी रात्रीच्या अंधारात २ वाजता दबक्या पावलांनी गेली होती. काही वेळाने तिचा पती रामलाल बारेला हा तिला शोधत शोधत त्याठिकाणी आला. दोघांना त्याने नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले.
दोघांना सोबत बघून रामलाल बारेला याचा राग मनात मावेनासा झाला. त्याने सुरेश सोलंकी याच्यासोबत झटापट केली. त्यावेळी रामलालची पत्नीने रामलाल यास सुरेशला मारु नको अशी विनवणी करुन सांगत होती. दरम्यान संशयित रामलाल याने कु-हाडीचा एकच घाव सुरेशच्या डोक्यात मागच्या बाजूने मारला. घाव वर्मी बसल्यानंतर तो मरण पावला. या झटापटील रामलाल बारेला याच्या पत्नीचे गळ्यातील मंगळसुत्र आणि पायातील पैंजण गळून पडले. हेच मंगळसुत्र आणि पायातील पैंजण पोलिसांच्या तपासात महत्वाचा दुवा ठरले.
या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, पोलिस अंमलदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, नंदलाल पाटील, विजय पाटील, भगवान पाटील, चालक अशोक पाटील तसेच जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि. महेश शर्मा व त्यांचे सहकारी स.पो. नि. अनंत अहिरे, हे.कॉ. चेतन पाटील, हे. कॉ. प्रविण पाटील, हे.कॉ. अनिल फेगडे, धनराज पाटील, नरेंद्र पाटील, पो.कॉ. प्रविण कोळी, तुषार जोशी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.
अवघ्या २४ तासात या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे शाखेसह जळगाव तालुका पोलिसांनी केली. अटकेतील संशयीत आरोपी रामलाल बारेला यास २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि. महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.