भडगाव तालुक्यातील घटना, दोन आरोपींना अटक
भडगाव (प्रतिनिधी):- भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी क्रमांक १ सीमा पदमिसंग परदेशी (वय २५, रा. महिंदळे) हिने ओळखीचा फायदा घेऊन पीडित अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढले. सीमाने तिची ओळख आरोपी क्रमांक २ तेजस मधुकर मराठे (रा. आंबेवडगाव, ता. पाचोरा) याच्याशी करून दिली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर, सीमा परदेशी हिच्या घरातच तेजसने पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
अत्याचारातून मुलगी राहिली गर्भवती
संशयित आरोपी तेजस मराठे याने लग्नाचे आमिष दाखवून आणि वेळोवेळी तीच्या वर अत्याचार केले. या सततच्या शोषणातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले आहे. हा प्रकार पीडितेच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली.
पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ६४(२), (m), ७४ तसेच पोक्सो (POCSO) कायदा कलम ४, ६, ८, १२ आणि १७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. बी. एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करत आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.









