चेतना व्यसनमुक्ती केंद्रातील दाखल मद्यपी व्यक्तींच्या पत्नींची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक
जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री साहेब, आर्थिक मदतीसाठी “लाडकी बहीण” योजना आणली. आता लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्र मद्यमुक्तदेखील करा हो…सोसवत नाही आता… पतीच्या व्यसनाचा संसाराला खूप त्रास आहे…अशी आर्त हाक जळगावच्या चेतना व्यसनमुक्ती केंद्रातील दाखल मद्यपी व्यक्तींच्या पत्नींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना घातली आहे. केंद्रात नातेवाईकांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली, त्यावेळी चर्चेतून भगिनींनी या भावनांना मोकळी वाट करून दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने महिलांसाठी “लाडकी बहीण योजना” सुरु करून आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता महाराष्ट्र मद्यमुक्त करून आणखी एक चांगली भेट आपल्या लाडक्या बहिणींना द्यावी अशी मागणी महिलांनी केली आहे. लाडकी बहीण योजना सुरू करून महाराष्ट्रातल्या माता-भगिनींची आशीर्वाद घेतलेत. त्यांना छोटासा का होईना एक आधार मिळाला. परंतु आज जेव्हा आपण आपल्या महाराष्ट्राकडे उघड्या डोळ्यांनी बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की, माता बहिणी दुःखी आहेत. कारण कुणाचा मुलगा, कुणाचा नवरा, कुणाचा भाऊ हा व्यसनाधीन आहे.
व्यसनामुळे माता भगिनींवर अत्याचार होतात. घरगुती भांडणे होतात आणि हे जर थांबवायचं असेल, माता भगिनींना खऱ्या अर्थाने आपल्याला आनंदी करायचं असेल तर महाराष्ट्रात दारूबंदी आपण केली पाहिजे, अशी मागणी समस्त महाराष्ट्र करीत आहे. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम असेल तर व्यसनमुक्ती गरजेची आहे, अशा भावना या मनीषा (पाचोरा), बालिका (जळगाव), भाग्यश्री (परभणी), पूजा (चाळीसगाव), नफिसा (यावल), अनिता (औरंगाबाद), तेजल (परभणी), शीतल भडगांव), नंदा (जामनेर), संगीता (जळगाव), सीमा (जामनेर), प्रियंका (औरंगाबाद), विद्या नांदेड), निकिता (मुक्ताईनगर), जयश्री जे. (शिरपूर), जयश्री (औरंगाबाद), नीलम (मलकापूर), कल्पना (रावेर), मीनाक्षी (नांदेड), विद्या (चिखली) आदी लाडक्या बहिणींनी नातेवाईकांच्या बैठकीत मांडल्या. या भगिनींच्या भावनांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरकारने केला पाहिजे, अशी विनंती चेतना केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून केले आहे.
“महाराष्ट्रात दारूमुळे होणारे नुकसान खूप मोठे आहे. समाजात वाढत चाललेले व्यसन हि फार मोठी समस्या आपल्या देशासमोर उभी आहे आज चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्र अमली पदार्थांच्या व्यसनांना आळा घालण्यासाठी मोठे योगदान देत आहे. या केंद्रात अनेक माता भगिनी यांनी त्यांच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांना व्यसनामुळे नुकसान झाल्याने दाखल केले आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या व्यसनामुळे त्यांना झालेले दुःख खूप मोठे आहे. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींच्या भावनांचा विचार करावा. आपल्या चुकीच्या दिनचर्यामुळे व्यसनापायी आपण आपले जीवन कठीण करून टाकले आहे.”
-नितीन विसपुते, संचालक, चेतना व्यसनमुक्ती केंद्र, जळगाव