
शासकीय विश्रामगृहातील बैठकीत धक्कादायक प्रकार; मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी
सावदा (प्रतिनिधी) : सावदा शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. या प्रकरणी दोघांविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीष यशवंत भंगाळे (वय ३२, रा. गावठाण बाजार, सावदा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता सावदा येथील शासकीय विश्रामगृहात घडली.
त्या दिवशी एका बैठकीसाठी उपस्थित असताना आरोपी मोईनखान मोहसीन खान याने फिर्यादीशी उर्मटपणे बोलत वाद घातल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून धक्काबुक्की व मारहाण केली. तसेच वाहनाची चावी हिसकावून घेत धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
यानंतर दुसरा आरोपी सुरज उर्फ (बद्री) संतोष परदेशी, रा. सावदा, यानेही वादात उडी घेत फिर्यादीच्या साथीदारावर लाकडी दांड्याने हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्ती जखमी झाली असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८०/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक जाकीर हारून मन्सुरी करीत असून, वृत्त लिहिपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.









