जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- किरकोळ कारणावरून दोघा भावांनी एका व्यक्तीला जबर मारहाण, शिवीगाळ केली. कोयत्याने खिडकीची काच आणि मोटार सायकलची तोडफोड केली. या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लकी उर्फ जितेंद्र ब्रिजलाल कोळी (सपकाळे) आणि आनंद ब्रिजलाल कोळी (सपकाळे) (दोघे रा. ओक नगर चौगुले प्लॉट, जळगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपी भावांची नावे आहेत. गणपती वर्गणीच्या वादातून योगेश नथ्थू आटोळे या खासगी इलेक्ट्रीक वायरमनला लकी कोळी याने रस्त्यात अडवले. लकी कोळी याने योगेश आटोळे यास शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान आनंद कोळी याने योगेश आटोळे यास पाठीमागून पकडून ठेवले. त्याचवेळी लकी कोळी याने योगेशच्या तोंडावर बुक्का मारुन त्याचा दात तोडला.
लकी कोळी हा कोयत्यासह आला असता पुन्हा दोघांनी योगेश यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अश्लिल शिवीगाळ करत लकी कोळी याने कोयत्याने फाडून टाकण्याची योगेश यास धमकी दिली. कोयत्याने योगेशच्या घराच्या खिडकीची काच फोडून जाळी तोडली. आनंद कोळी याने योगेशच्या मोटार सायकलचे नुकसान केले. या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय शेलार करीत आहेत.