विहिरीत ढकलून केला खून, धरणगाव तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे धक्कादायक घटना उघड झाली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या दिव्यांग पतीला विहिरीत ढकलून देत त्याचा निर्घृणपणे पत्नीने खून केला आहे. हि घटना दि. २ जून रोजी घडली असून केवळ बदनामीच्या भीतीपोटी मयत व्यक्तीच्या काकाने उशिरा फिर्याद दिली. दरम्यान, धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नीला अटक करण्यात आली आहे.
प्रकाश यादव धोबी (वय ४५, रा. भवरखेडा ता. धरणगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो गावात पत्नी ज्योती, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होता. तो पायाने दिव्यांग असतानाही परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, पत्नी ज्योती हिचे माहेरी येथे गावातील एकाशी अनैतिक संबंध असल्याची त्याला माहिती होती. पत्नी ज्योतीसोबत त्यांचे अनेकदा शाब्दिक वाद झाले होते. दि. २ जून रोजी ज्योती धोबी यांनी पती प्रकाश धोबी यांना मुंजोबा मंदिरात पूजेसाठी जायचे म्हणून घेऊन गेली होती.
तेथे शालिक पाटील यांच्या शेतात मुंजोबा मंदिरात आशीर्वाद घेतल्यांनंतर तेथे असलेल्या विहिरीजवळ पत्नी घेऊन गेली. तेथे परत त्यांचे वाद झाले. त्यानंतर पत्नीने पती प्रकाश धोबी यांना विहिरीत ढकलून देत हत्या केली. काही अंतरावरून प्रकाश धोबी यांचे काका अर्जुन धोबी याने हि घटना पाहिली. मात्र बदनामीच्या भीतीने त्यांनी कोणाला सांगितले नाही. त्यानंतर बुधवारी दि. १२ जून रोजी काका अर्जुन धोबी यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावर हि घटना उघड झाली आहे. खून करणाऱ्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेने धरणगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.