एमआयडीसी पोलिसांकडून आरोपीला २४ तासांत अटक
जळगाव (प्रतिनिधी) :- जुन्या प्रेमसंबंधातून एका ३९ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिचा पद्मालय परिसरातील जंगलात नेऊन दगड ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी वेगाने सूत्रे हलवत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या २४ तासांत संशयित आरोपीला जेरबंद केले आहे.


एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कविता अरुण सुतार (वय ३९) या महिला ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी राहत्या घरातून अचानक लापता झाल्या होत्या. नातेवाईकांकडे शोध घेऊनही त्या मिळून न आल्याने त्यांच्या मुलाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण सुरू केले. तपासादरम्यान १३ सप्टेंबर रोजी एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पद्मालय परिसरातील घनदाट जंगलात बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळून आला. यावरून अपहरणकर्त्यानेच महिलेचा खून केल्याचे उघड झाले.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे जळगाव शहरातून सापळा रचून नरेश उर्फ आबा अनिल सोनवणे (वय २९, रा. रेणुका नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने जुन्या प्रेमसंबंधातून कविता सुतार यांचे अपहरण करून दगडाने ठेचून खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
ही कामगिरी जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पो.उ.नि. विजयसिंग पाटील, किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, विशाल कोळी, किरण पाटील व गणेश ठाकरे यांच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करत आहेत.








