यावल शहरातील घटना : परस्परविरोधी गुन्हे दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : यावल शहरामध्ये क्षुल्लक कारणावरून दोन जणांमध्ये हाणामारी होऊन त्यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजळ घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला सुरुवातीला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून सकाळी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
प्रभाकर आनंदा धनगर (वय ६०, रा.धनगर वाडा, यावल) असे मयत इसमाचे नाव आहे. तो त्याच्या परिवारासह यावल शहरात राहतो. शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ ते साडेसहा वाजेच्या सुमारास यावल शहरातील बोरावल गेट परिसरात भिकन धनगर यांच्या टपरीसमोर सार्वजनिक जागी प्रभाकर धनगर आणि संशयित आरोपी रामा केशव ढाके (वय ५५, रा.देशमुख वाडा, यावल) हे दोघे बसले होते. त्यावेळेला दोघांमध्ये सुरुवातीला मस्करी सुरू झाली.
त्यानंतर मस्करीतून वाद निर्माण होऊन संशयित रामा ढाके याने त्याच्याकडील चाकूने प्रभाकर धनगर याला पोटात भोसकले. यामुळे प्रभाकर धनगर हा गंभीर जखमी झाला. त्याला नातेवाईकांनी तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी रात्री दाखल केले. तेथे तासाभरानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला सुरुवातीला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले. यात प्रभाकर धनगर यांचे भाऊ आनंदा धनगर यांच्या फिर्यादीवरून रामा केशव ढाके याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सकाळी प्रभाकर धनगर यांचा मृत्यू झाल्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम यावल पोलीस स्टेशनला सुरू होते.
तर आशा रामा ढाके (वय ५०) यांच्या फिर्यादीवरून संशयित प्रभाकर आनंदा धनगर यांच्याविरुद्धदेखील खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर धनगर यांनी रामा ढाके याला अश्लील शिवीगाळ करून डोक्यात लोखंडी सळई मारून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक राकेश मानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुजफ्फर खान हे तपास करीत आहेत. मयत प्रभाकर धनगर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगा असा परिवार आहे. प्रभाकर धनगर हे शेती काम करून उदरनिर्वाह करीत होते.