अमळनेर येथील हॉटेल चालकाचे कृष्णकृत्य सीसीटीव्हीतून उघड ; खुनाचा गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) :- येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १५ वर्षांपासून हॉटेलमध्ये सेवा देणाऱ्या वेटरचा मालकानेच बेदम मारहाण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वेटरच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने मारहाण करून त्याचा खून झाल्याचा प्रकार तब्बल तीन महिन्यांनी उघडकीस आला. पोलिसांच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी नरेंद्र उर्फ भटु यशवंत चौधरी (रा.माळी वाडा) याची सुजाण मंगल कार्यालयाजवळ हॉटेल असून मयत दगडू उर्फ बाबूभाई नारायण पाटील हा तेथे वेटर म्हणून काम करीत होता. दगडू पाटील गेल्या १५ वर्षांपासून सुरत येथे राहणाऱ्या कुटुंबापासून वेगळा राहत होता. तसेच, अमळनेर येथे हॉटेलवर काम करीत होता. हॉटेल मालक नरेंद्र चौधरी याने २२ एप्रिल रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिली होती की, सकाळी सहा वाजता हॉटेलकडे चक्कर मारला असता दगडू पाटील खाली दगडावर पडलेला होता. त्याच्या डोक्याला जखम होती व छातीला खरचटले होते. तेथून नरेंद्र याने त्यास खाजगी रुग्णवाहिकेने धुळे येथे उपचारासाठी दाखल केले होते.
त्यानंतर सुरत येथे नातेवाईकांच्या ताब्यात देऊन उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते. ६ मे रोजी त्याचा सुरत येथे मृत्यू झाला होता. चौधरी याने अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र सुरत येथील अहवाल, दगडू पाटील यांच्या अंगावरील जखमा आणि साक्षीदार यांच्या म्हणण्यानुसार तफावत आढळून आल्याने पोलिसांना संशय आला होता. पोलिसांनी घटनास्थळजवळील फुटेज तपासले.
दि. २२ रोजी पहाटे हॉटेल मालक नरेंद्र चौधरी हा वेटर दगडू पाटील याला मारहाण करीत होता. दगडू खाली पडल्यावर त्याच्या छातीवर व डोक्यावर लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत होता. तसेच जवळील पडलेली लोखंडी वस्तू उचलून दगडूच्या डोक्यावर तीन वार केले. डोक्यात दगडही मारला आणि त्याला जखमी अवस्थेत सोडून गेला. दगडूचा मृत्यू नरेंद्र याच्या मारहाणीनेच झाला असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस कर्मचारी घनश्याम अशोक पवार यांच्या फिर्यादीवरून नरेंद्र चौधरी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत