फैजपुरात केळी पिकाविषयी विशेष परिसंवादाला प्रतिसाद
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- केळी पिकाविषयी फैजपूर येथे विशेष परिसंवाद घेण्यात आला. परिसंवादात केळी पिकावरील आजार, केळी लागवड आदींविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध तज्ज्ञांची उपस्थिती होती.
कृषी क्षेत्रासाठी आयुष्य समर्पित केलेले कृषीमित्र दिवंगत हरिभाऊ जावळे यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त जिल्हाभरातील शेतकऱ्यांसाठी विशेष परिसंवाद घेण्यात आला. केळ्यावर होणार्या अनेक आजारापैकी सिएमव्ही या महाभयंकर रोगाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी हा कार्यकम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ, जळगावचे के.बी.पाटील यांनी, केळीचे अन्नद्रव्य आणि करपा पिटिंग तसेच सीएमव्ही या रोगाचे नियंत्रण कसे करावे या बद्दल पाटील यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर मार्गदर्शक प्रसिद्ध केळी निर्यातदार संचालक किरण ढोके यांनी केळी उत्पादकांनी निर्यात कशी करावी या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बलराम सिंग सोळंके यांनी केळी निर्यातीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, आयत निर्यात प्रक्रीया, बँक हमी आणि जागतिक व्यापार याविषयी त्यांनी मार्गदशन केले. यावेळी रावेर, यावल, मुक्ताईनगर आणि मध्यप्रदेशातील बुरहानपुर इत्यादी तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
दिवंगत हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे, फैजपुरचे प्रांत अधिकारी कैलास कडलग, रावेरचे तहसिलदार तसेच फैजपूरचे पोलिस अधिकारी पदमाकर महाजन, नंदुभाऊ महाजन, श्रीकांत महाजन, हरलाल कोळी, रवि महले आदी उपस्थित होते.