जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- कासवांची तस्करी करताना नशिराबादच्या तिघांना वनविभागाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई बुधवारी केली. याप्रकरणी तिघा आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय श्रावण कोळी, भूषण संजय कोळी व अकबर अली मेहमूद (रा.नशिराबाद) असे या आरोपींची नावे आहेत. कासवांची विक्री करणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार या तिघांवर पाळत ठेवण्यात आली होती. तिघेही जण कासव विक्रीसाठी आले असताना वनविभागाने त्यांच्यावर झडप मारली आणि तीन कासवांसह आरोपींना ताब्यात घेतले.
उपसंचालक योगेश वरकड, उपवनसंरक्षक प्रवीण ए., सहाय्यक वनसंरक्षक यु.एम.बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचीन जाधव, नितीन बोरकर, वनपाल योगेश दीक्षित, संदीप पाटील, वनरक्षक भागवत तेली, अजय रायसिंग, हरीश थोरात, दीपक पाटील, गुलाबसिंग ठाकरे, वाहनचालक भगवान चिम यांनी केली.पंचनामा मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई व उमेश पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.पुढील तपास बिराजदार व बोरकर करीत आहेत.