चाळीसगाव तालुक्यातील बहुर गावातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मेहुणबारे येथे कर्जाच्या विवंचनेतून महिलेने आत्महत्या करून जीवन संपविल्याची खळबळजनक घटना रविवारी उघड झाली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शीतल बापु पाटील (वय ३५, रा. बहुर ता. चाळीसगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. महिला पती, दोन मुले व सासु – सासऱ्यांसह राहत होती. त्यांच्याजवळ दीड एकर शेती होती. त्यावरच घराचा प्रपंच सुरू होता. शेतीला जोडधंदा व्हावा, म्हणून महिलेच्या पतीने एका फायनान्स कंपनीकडून साडेचार लाखांचे कर्ज काढून मालवाहू वाहन घेतले. त्यात बचत गटाचे देखील चार लाखांचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडणार याची महिलेला सतत चिंता लागलेली होती. मी सर्व कर्ज फेडून टाकेन, तु चिंता करू नको असा धिर देत पती नेहमी समजूत काढत होते.
दरम्यान रविवारी दि. २२ ऑक्टोम्बर रोजी सायंकाळपर्यंत विवाहितेचे पती शेतात होते. तर मुले गावातच देवीच्या आरतीला गेलेले होते. तर सासरे लहान दिराकडे तर सासू गावी गेलेली होती. पती शेतातून घरी आले असता महिलेने कर्जाची चिंता वाटत असल्याचे पतीला सांगितले. पतीने पत्नीची समजूत काढत देवीची आरती करण्यास निघून गेले. काही वेळाने दोन्ही मुले व पती घरी आले असता शीतल पाटील या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. आईची अवस्था पाहून पती व दोन्ही मुलांनी एकच हंबरडा फोडला. यावेळी ग्रामस्थांनी महिलेला दवाखान्यात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात पतीेने दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.