कल्याण (वृत्तसंस्था) – प्रिस्कुलच्या शिक्षिकेनं चिमुकल्या विद्यार्थिनीच्या हातावर विकृतपणे चिमटे काढल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाला. मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई केलेली नसल्यानं संताप व्यक्त होतोय. नोकरदार आईवडील कामावर जाताना आपल्या मुलांना दिवसभर सांभाळण्यासाठी डे केअर सेंटरमध्ये सोडून जातात. तिथे मुलांना दिवसभर सांभाळण्यासोबतच शिकवलंही जातं. कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा वसंत व्हॅली परिसरात अशीच लर्निंग कर्व्ह नावाची संस्था आहे. या संस्थेत दीपक माखीजा आणि वृत्ती माखीजा हे चार्टर्ड अकाउंटंट दाम्पत्य त्यांच्या तीन वर्षीय मुलीला दिवसभर सोडून जात होते. मात्र 12 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुलीने प्रिस्कुलमधून परत जाताना आपल्याला टिचरने मारल्याचं आईला सांगितलं. तिच्या हातावर नखं लागल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे वृत्ती माखीजा यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. यानंतर शाळेचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता त्यात खुशबू नावाची शिक्षिका या मुलीला चिमटे काढताना स्पष्टपणे कैद झाल्याचं त्यांना आढळलं. तर दुसरीकडे लर्निंग कर्व्ह संस्थेचे क्लस्टर हेड निनाद मुंडे यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळत यात आपल्या शिक्षिकेची काहीच चूक नसल्याचं सांगितलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेला आता महिना होत आला असला, तरी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यापलीकडे काहीही कारवाई केलेली नाही. शिवाय कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी याबाबत कॅमेरासमोर बोलायलाही नकार देत इतक्या छोट्या प्रकरणात मी प्रतिक्रिया देणार नसल्याचं सांगितल्यानं पोलिसांच्या हेतुवरच शंका उपस्थित झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रिस्कुल प्रशासनाविरोधात कारवाई करण्याची मागणी विद्यार्थिनीची आई वृत्ती माखीजा यांनी केली आहे.