जळगाव (प्रतिनिधी) – निवडणूक आयोगाने निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर एका बाजूने मतदार यादी पुनरीक्षण, तर दुसरीकडे जिल्हा पातळीवर मतदान यंत्र तपासणीचे काम सुरू केले आहे. मतदार यादी पुनरीक्षणासाठी बीएलओ (केंद्रस्तरीय मतदान अधिकारी) आता आज , २१ जुलैपासून ‘होम टू होम’ जाणार आहेत. या मोहिमेत मतदार यादी दुरुस्तीशी संबंधित कामे पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली आहे.
एक जूनपासून मतदार यादी पुनरीक्षणपूर्व कार्यक्रम सुरू झाला आहे. तो १६ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. मतदार यादीसाठी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक आहे. आजपासून जिल्ह्यातील साडेचार हजार बीएलओ हे मतदारसंघातील प्रत्येक घराघरात जाणार आहेत. ८० वर्षांवरील मतदारांची यादी तयार करणे, मृत मतदारांचा मृत्यू दाखला घेऊन त्यांचे नाव यादीतून वगळणे, स्थलांतरीत कुटुंबाकडून फॉर्म भरून घेणे, १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलामुलींचे नवीन मतदार नोंदीसाठी कागदपत्र स्वीकारणे आणि मतदार यादीशी आधार लिंक करण्यासाठी आधार कार्डची माहिती घेणे आदी कामे करण्यात येणार आहेत. २१ जुलै ते २१ ऑगस्ट ही मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान, १६ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष नवीन मतदार नोंदणीची कार्यवाही सुरू होणार आहे.
१ जानेवारी २०२४ वर आधारीत ही नोंदणी होणार आहे. ५ जानेवारी २०२४ रोजी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. नवमतदार नोंदणीची विशेष मोहिमही राबविण्यात येणार आहे. विशेष करून दिव्यांग, तृतीयपंथी, महिला मतदारांच्या नोंदणीवर भर देण्याच्या सूचना आहेत. प्रत्येक महाविद्यालयांमध्येही १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक व युवतींचे प्रबोधन करून मतदार नोंदणीचे आवाहन करण्यात येणार आहे.
२१ जुलैपासून बीएलओ घरोघरी येणार असून, त्यांना माहिती संकलित करण्याच्या सूचना आहेत. आयोगाकडून हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करून मतदार यादीतील आपल्या नाव तपासणी, दुबार नाव वगळणे याकरिता सहकार्य करावे. असे आवाहन ही श्री.चिंचकर यांनी केले आहे.