ट्रकने दिलेल्या धडकेत बसचे नुकसान
नंदूरबार (प्रतिनिधी) :- राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाची जामनेर- सुरत बसला शुक्रवारी ३ नोव्हेंबरला नवापूरजवळ अपघात झाला आहे. बस व ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला असून यात ८ ते १० प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नावापूरजवळील सीमा तपासणी नाक्याजवळ हा अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी जामनेरहून सुरतकडे बस मार्गस्थ झाली होती. बस दुपारी नवापूर बसस्थानकावर आली होती. तेथून नोंद झाल्यावर व प्रवासी घेऊन नवापूर बसस्थानकावरून निघाल्यानंतर दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास नागपूरच्या सीमा तपासणी नाक्याजवळ सुरतकडून महाराष्ट्र राज्यात येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघातात जवळपास ८ ते १० प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातात जखमी प्रवाशांवर नवापूर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे नवापूर तालुक्यात अपघात वाढले असल्याचे बोलले जात आहे. जामनेर सुरत बस मधील प्रवाश्यांना पर्यायी बस व्यवस्था करण्यात आली आहे.