अवैध उत्खननामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडाल्याचा आरोप
जळगाव (प्रतिनिधी):- यावल तालुक्यातील आमोदे येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरून गौण खनिजाचे अवैध उत्खनन व विक्री झाल्याच्या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून, यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यासंदर्भातील सविस्तर अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. अहवालानुसार, कारखान्याच्या जमिनीवरून गौण खनिजाचे अनधिकृतरीत्या उत्खनन करण्यात आले आणि त्याची विक्रीही करण्यात आली. या संपूर्ण प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणाची तक्रार फैजपूर येथील माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी ३० जानेवारी २०२४ रोजी केली होती. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी विविध अर्ज आणि निवेदने सादर करून या प्रकरणाचा पाठपुरावा केला. तसेच आमदार सुरेश दामू भोळे यांनीही या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
तपासादरम्यान संबंधित महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजात त्रुटी आढळून आल्याने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. यावल तहसीलदार यांनी पर्यवेक्षणीय जबाबदारी पार पाडताना कसूर केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून, त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान, हा अहवाल विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, पुढील कारवाईकडे महसूल विभागासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.











