मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याविरोधात तृतीयपंथीयांचा रास्ता रोको
जळगाव (प्रतिनिधी) :- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याविरोधात तृतीयपंथीयांनी आकाशवाणी चौकात रास्ता रोको केला. यावेळी पालकमंत्री होश मी आओ, होश मी आओ… पालकमंत्री हाय हाय… अशा घोषणा देत तृतीयपंथीय समाजाने चौक दणाणून सोडला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
आरक्षणासह विविध मागण्यांसाठी तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या राज्य समन्वयिका शमिभा पाटील यांचे गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे. आता त्यांची अचानक प्रकृती खालावली आहे. जिल्हा प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत तृतीयपंथीय समाजाने महामार्गावरील आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसून निषेध केला. यावेळी पोलिसांचीही तारांबळ उडाली. स्थानिक पातळीवर तृतीयपंथीयांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य समन्वयिका शमिभा पाटील, पार्वती जोगी गुरू (धुळे), मयूरी आळेकर (कोल्हापूर) यांच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी (३ नोव्हेंबर) पाचव्या दिवशी शमिभा पाटील यांची अचानक प्रकृती खालावल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धाव घेत तपासणी केली. त्यामुळे तृतीयपंथीय समाजाने दुपारी महामार्गावरील आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांना, दूरध्वनीवर, ‘जे करायचे ते करा …’ असे बेजबाबदार वक्तव्य केल्यामुळे समाज आणखी संतापला.
तृतीयपंथीय समाजाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात चांगलीच घोषणाबाजी केली. तसेच, पालकमंत्र्यांनी आमचे प्रश्न सोडविण्याऐवजी बेजबाबदार वक्तव्य करू नये, असे तृतीयपंथीयांनी सांगितले. प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर उपोषणकर्त्यांच्या वतीने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र, प्रवेशद्वार बंद होते. त्यामुळे समर्थकांनी प्रवेशद्वारावर चढून थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसून घोषणाबाजी करीत शासन- प्रशासनाचा निषेध केला. त्यामुळे स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.