संशयित आरोपीला ग्रामस्थांनी केले पोलिसांच्या हवाली
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यात खुनांचे सत्र थांबायला तयार नाही. सोमवार दि.१ जुलै रोजी तालुक्यातील शहापूर येथे एका महिलेचा अनैतिक संबंधातून दगडाने चेहरा ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सकाळी साडेदहा ते ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संशयित आरोपीला तळेगाव येथील ग्रामस्थांनी पोलिसांच्या हवाली केले आहे.
संगीताबाई पिराजी शिंदे (वय ३६ रा. शहापूर ता. जामनेर) असे मयत महिलेचे नाव आहे. ती विधवा असुन गावामध्ये एकटेच राहत होती. तळेगाव येथील संशयित आरोपी किरण संजय कोळी उर्फ लहान्या (वय ३०, रा.तळेगाव) याच्यासोबत तिचे काही महिन्यांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. सोमवारी दि. १ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित किरण कोळी हा सदर महिला संगीताबाई हिच्या घरी मद्यधुंद अवस्थेत आला होता.
त्या ठिकाणी दोघांमध्ये आर्थिक कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संशयित किरण कोळी याने महिलेला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर तिच्या घरातच तिच्या चेहऱ्यावर दगड टाकून व् लाकडी दांडक्याने तिचा खून केला.
दरम्यान ग्रामस्थांना याची खबर लागताच त्यांनी संशयित किरण कोळी याला तळेगाव येथून पकडून पोलिसांच्या हवाली केले पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान सदर महिलेचा मृतदेह हा जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्याचे काम सुरू होते जामनेर जिल्ह्यात पुन्हा एकदा खून झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. जामनेर पोलीस स्टेशनला घडण्याची नोंद करण्याचे काम सुरू असून पोनि किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दीपक रोटे करीत आहेत.