
जळगाव (प्रतिनिधी):- जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून बनावट व अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिस प्रशासनाने कारवाईत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे ₹9,15,416 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर केस ही प्रोबेशनरी dysp प्रशांत दरेकर यांनी केली आहे .. कायद्याची तरतूद म्हणून कृषी विकास अधिकारी, पंचायत समिती जामनेर यांची फिर्याद घेतली आहे . जामनेर शहरातील साईनगर परिसरात राहणाऱ्या दीपक राजमल चौधरी यांच्या राहत्या घरात अनधिकृतरित्या कापूस बियाण्यांचा साठा करून त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिस विभागाला प्राप्त झाली होती.
या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान घरामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस बियाण्यांची पोती व पॅकेट्स आढळून आली. एकूण 40 गोण्या आणि 1016 पॅकेट्सजप्त करण्यात आली. या पॅकेट्सवर विविध कंपन्यांची नावे व बॅच क्रमांक नमूद करण्यात आलेले होते.
तपासादरम्यान संबंधित व्यक्तीकडे बियाणे विक्रीचा वैध परवाना, साठा परवाना किंवा विक्रीसंबंधी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तसेच जप्त केलेल्या बियाण्यांच्या खरेदी-विक्रीबाबत कोणतेही समाधानकारक पुरावे सादर करण्यात आले नाहीत.
जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये खालील प्रमुख लॉटचा समावेश आहे:
* Diya-59 (KDCHH 02 BG II) – 250 पॅकेट्स
* Diya-59 (KDCHH 02 BG II) – 200 पॅकेट्स
* Krish-45 (KDCHH 065 BG II) – 566 पॅकेट्स
सर्व पॅकेट्सची एकत्रित किंमत ₹9,15,416 इतकी असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात संबंधित बियाणे उत्पादक कंपनीची अधिकृत विक्री व्यवस्था व परवानगी न घेता हे बियाणे बाजारात विक्रीसाठी आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याची तसेच निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
या प्रकरणी खालील व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे:
1. दीपक राजमल चौधरी, साईनगर, जामनेर
2. गुलाब आधार पाटील, वर्दी, ता. पाचोरा
3. शेषराव पाटील, वर्दी, ता. पाचोरा
4. इतर संबंधित व्यक्ती
सदर प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023, बियाणे अधिनियम 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 तसेच इतर संबंधित कायद्यांतील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .











