जामनेर–नांद्रा प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये वृद्धाचे ६६ हजारांचे मंगळसूत्र लांबवले; जामनेर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेर: एसटी बसमधील वाढत्या गर्दीचा फायदा घेत भामट्यांनी एका वृद्ध महिला प्रवाशाच्या गळ्यातील ६६ हजार रुपये किमतीची दोन सोन्याची मंगळसूत्रे लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. जामनेर ते नांद्रा प्रवासादरम्यान ही धाडसी हातचलाखी घडली असून या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आशालता जगन्नाथ पाटील (वय ७०, रा. नांद्रा प्र.लो., ता. जामनेर, जि. जळगाव) या २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास जामनेर बसस्थानकातून नांद्रा येथे जाण्यासाठी एसटी बसमध्ये चढल्या होत्या. बसमधील गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात भामट्याने अत्यंत चलाखीने त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची ५४ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत असलेले एक मंगळसूत्र आणि ४ ग्रॅम वजनाची १२ हजार रुपये किमतीची दुसरी सोन्याची पोत असलेले दुसरे मंगळसूत्र असा एकूण ६६ हजार रुपयांचा मौल्यवान ऐवज चोरून नेला.
प्रवासादरम्यान गळ्यातील दागिने गायब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. आशालता पाटील यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ३४३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रतापसिंग मथुरे करत असून बसस्थानक परिसरातील संशयितांचा शोध घेतला जात आहे.









