जळगाव नवीन बसस्थानकावर घटना, गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील नवीन बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्याने एका ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील आणि हातातील तब्बल ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


धुळे येथील शिवाजीनगर, पारस मंगल कार्यालयाच्या मागे, वाडी भोकर रोड परिसरातील रहिवासी प्रभावती पंडितराव विसपुते (वय ६०) या १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी जळगाव नवीन बसस्थानकावरून बसमध्ये चढत होत्या. सायंकाळी ७:३० ते ८ वाजेच्या सुमारास प्रवाशांची मोठी गर्दी होती. बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत प्रभावती विसपुते यांच्या अंगावरील ७५ हजार रुपये किमतीची २८ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ आणि १५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, असा एकूण ९० हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला.
दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच विसपुते यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू आहे.









