जळगाव ( प्रतिनिधी ) – विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी, तसेच ध्वनिप्रदूषण टाळून गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे यंदा डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प करण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात व भक्तिमय वातावरणात श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली.


यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, डॉ. ज्ञानेश्वर सिंग, प्रा. सुशील चव्हान शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. मंत्रोच्चार, आरती आणि गणरायाच्या जयघोषात गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत उत्सवाची शोभा वाढवली.
“उत्सव साजरा करूया, मात्र ध्वनिप्रदूषण टाळूया” हा संदेश देत महाविद्यालयाने डीजेला पूर्णपणे फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी उत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करण्यासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, शिस्तबद्ध, संस्कृतीप्रधान आणि डीजेमुक्त गणेशोत्सवाची अनोखी सुरुवात शैक्षणिक संस्थेत झाली आहे.









