अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) –चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन व्यक्तींचे अज्ञात इसमांनी अपहरण केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहितेनुसार अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


पहिली घटना : तळेगाव शिवारातील शेतातून ज्ञानेश्वर ढोणे यांचे अपहरण
तळेगाव (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी ज्ञानेश्वर विष्णू ढोणे (वय ४५, रा. तळेगाव) हे ११ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास तळेगाव-शिंदी रस्त्यालगत असलेल्या स्वतःच्या शेतात गेले होते. तेथून अज्ञात व्यक्तीने जबरदस्तीने किंवा फसवणूक करून त्यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर ढोणे यांचा शोध घेऊनही ते न सापडल्याने त्यांच्या पत्नी पल्लवी ज्ञानेश्वर ढोणे (वय ४०) यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा. पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल तुकाराम चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दुसरी घटना : प्रांत ऑफिस परिसरातून चिंधा गायकवाड बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
दुसऱ्या घटनेत, तामसवाडी (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी चिंधा सोनू गायकवाड (वय ५०) हे २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास चाळीसगाव येथील करगाव रोडवरील प्रांत ऑफिस परिसरात गेले होते. तेथून अज्ञात कारणासाठी अज्ञात इसमाने त्यांना गुप्त व बेकायदेशीर डांबून ठेवण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याची बाब समोर आली आहे.
याप्रकरणी त्यांची पत्नी मनीषाबाई चिंधा गायकवाड (वय ४३, रा. तामसवाडी) यांनी १२ सप्टेंबर रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण जाधव तपास करत आहेत. दोन्ही प्रकरणांतील संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत.








