वाघनगर परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील वाघ नगर परिसरातील डिगंबर हौसिंग सोसायटी येथील विवाहितेचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना रविवारी २४ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान, विवाहितेच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असून गळा आवळला असल्याची शक्यता वर्तविता माहेरच्या कुटुंबीयांनी विवाहितेच्या सासरच्यांवर घातपाताचा आरोप केला आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पल्लवी योगेश पाटील (वय ३५, रा. वाघनगर, जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. ती पती, दोन मुली, सासूसह राहत होती. पती योगेश हे जिल्हा परिषदेत कंत्राटी अभियंता म्हणून काम करतात. दरम्यान, पल्लवीच्या माहेरी सासरच्यांनी रविवारी पहाटे फोन करून बोलावून घेतले. त्यावेळी पल्लवी किचनमध्ये चक्कर येऊन पडली. तिला खाजगी रुग्णालयात नेले होते अशी माहिती सासरच्यांनी माहेरच्या लोकांना दिली. तेव्हा पल्लवीच्या माहेरच्यांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषित केले.
यावेळी माहेरच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, पल्लवीच्या गळ्यावर,पोटावर, चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा असल्याचे सांगत, हा घातपात असून पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी असल्याची माहिती माहेरच्या कुटुंबीयांनी दिली आहे. दरम्यान, पल्लवी पाटील यांच्यासोबत काय झाले हे समजू शकलेले नाही. रामानंद नगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील कार्यवाही सुरु असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.