गुप्त माहितीच्या आधारे बुलेट मोटारसायकलवर कारवाई; चलनी नोटांसारख्या दिसणाऱ्या बनावट नोटांसह दोन जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव, ( प्रतिनिधी ) : जळगाव शहर वाहतूक शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत दोन इसमांकडून १० लाख १५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात चलनी नोटांसारख्या दिसणाऱ्या नोटा, बुलेट मोटारसायकल, मोबाईल फोन आणि इतर साहित्याचा समावेश आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंडाम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय बातमीदारामार्फत जळगाव शहरात काही इसम सोन्याचे बिस्किट घेऊन त्याच्या बदल्यात चलनी नोटांसारख्या दिसणाऱ्या कागदांच्या साहाय्याने फसवणूक करण्याच्या संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तपासणी केली.
१२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.२० वाजता ममुराबाद रोड परिसरात बुलेट मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हरिभाऊ राजेंद्र महाजन (वय ३०) आणि सुजित गोकुळ महाजन (वय २६), दोघेही रा. मंदिरे, आडवाड, ता. चोपडा, जि. जळगाव, अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी केलेल्या तपासणीत १०० रुपये दर्शनी मूल्याच्या ५ हजार चलनी नोटांसारख्या नोटा, ५०० रुपये दर्शनी मूल्याच्या ५०० नोटा, बुलेट मोटारसायकल, दोन मोबाईल फोन, विविध दरांच्या नोटांसारखे कागद आणि इतर साहित्य असा एकूण १० लाख १५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दोन्ही संशयितांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंडाम आणि त्यांच्या पथकाने केली.








