आवक घटल्याने भाव वधारले; प्रतिक्विंटल १,९५० रुपयांपर्यंत दर, उत्पादकांना दिलासा
जळगाव ( प्रतिनिधी ) :- जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात गेल्या आठवडाभरात तब्बल ५०० रुपये प्रतिक्विंटलची वाढ झाली असून दीर्घकाळ कमी भावामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी (दि. १९) बाजार समितीत कांद्याची आवक केवळ १५० क्विंटल झाली. आवक घटल्याने दरात लक्षणीय वाढ होऊन चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल १ हजार ९५० रुपयांपर्यंत भाव मिळाला.


आवक घटल्याचा दरांना आधार
जळगाव बाजार समितीत स्थानिक कांद्याबरोबरच नाशिक, धुळे आणि औरंगाबाद जिल्ह्यांतूनही कांद्याची आवक होत असते. मात्र सध्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्येही कांद्याचे दर सुधारल्याने शेतकरी वाहतूक खर्च टाळण्यासाठी जवळच्या बाजारपेठांमध्येच माल विकण्यास प्राधान्य देत आहेत. परिणामी जळगाव बाजार समितीतील कांद्याची आवक कमी झाली असून त्याचा थेट परिणाम दरवाढीवर झाला आहे.
उन्हाळ्याचा दर्जावर परिणाम
यंदाच्या तीव्र उष्णतेमुळे चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याचा दर्जा अनेक ठिकाणी घसरला आहे. काही शेतकऱ्यांना कांदा टाकून देण्याची वेळ आली, तर अनेकांनी आर्थिक गरजेमुळे कमी भावातच माल विक्री केला. त्यामुळे सध्याच्या दरवाढीचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळू शकणार नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आठवडाभरातील दरवाढ
बाजार समितीच्या आकडेवारीनुसार १५ जून रोजी कांद्याला प्रतिक्विंटल ५०० ते १,५०० रुपये दर मिळत होता. त्यानंतर १६ जूनला ४८७ ते १,५५२ रुपये, १७ जूनला ६२५ ते १,६६२ रुपये, १८ जूनला ५०० ते १,७०० रुपये आणि १९ जून रोजी ५७५ ते १,९५० रुपये असा दर मिळाला. आठवडाभरात उच्चांकी दरात जवळपास ५०० रुपयांची वाढ झाल्याचे चित्र आहे.
पुढील काळाकडे लक्ष
सध्या बाजारातील आवक मर्यादित असल्याने दर टिकून आहेत. मात्र आगामी काळात आवक वाढल्यास दरांमध्ये पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या तरी कांद्याच्या दरातील वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.









