नग्न फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत कृत्य
जळगावच्या रामानंद नगर पोलिसांत तिघांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : – येथील एका महाविद्यालयीन तरुणीला अमली पदार्थांच्या आहारी लावून, तिचे आक्षेपार्ह फोटो काढून वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध ‘पोक्सो’सह (POCSO) विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्मल तिवारी, जय चौधरी आणि गौरव पुरोहित अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.


पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, पीडित तरुणी आणि तिची एक मैत्रीण शालेय जीवनापासून एकमेकींच्या परिचयाच्या होत्या. महाविद्यालयीन वयात आल्यानंतर या मैत्रिणीच्या माध्यमातूनच पीडितेचा काही तरुणांशी संपर्क आला. मैत्रिणीने सुरुवातीला पीडितेला सिगारेटचे व्यसन लावले आणि त्यानंतर हळूहळू दारू व अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) सेवनाकडे वळवून तिला व्यसनाच्या जाळ्यात ओढले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पीडिता व्यसनाच्या आहारी गेल्याचा गैरफायदा घेत संशयित आरोपीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान संशयिताने पीडितेचे काही खाजगी व नग्न फोटो मोबाईलमध्ये काढून घेतले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने तिला काही काळ स्वतःच्या ताब्यात ठेवले व तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
काही काळानंतर पीडित तरुणीने आरोपीशी संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीच्या ओळखीतील दुसऱ्या एका संशयिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितेला अश्लील संदेश पाठवून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तर या प्रकरणातील तिसऱ्या संशयिताने पीडितेला अमली पदार्थ पुरवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या सर्व त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने आपल्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. वडिलांच्या उपस्थितीत तिने रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी निर्मल तिवारी, जय चौधरी आणि गौरव पुरोहित या तिघांवर पोक्सो कायदा व इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. रामानंद नगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









