जळगावातील घटना : सापळा रचून महिलेसह दोघांना अटक
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका ५५ वर्षीय व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्याखाली अडकवण्याच्या नावाखाली ५ लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या महिलेसह पुरुषाला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक ५५ वर्षीय व्यावसायिक परिवारासह राहतात. त्यांच्या परिचयातील असलेले एका हॉटेलचे मालक संशयित आरोपी वकील उखा राठोड (वय ३०, रा. रामदेववाडी ता. जळगाव) यांनी जुलै महिन्यामध्ये एका ३८ वर्षीय वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची ओळख करून दिली होती. त्यानंतर या ५५ वर्षीय व्यावसायिकाने सदर महिलेसोबत सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.(केसीएन)त्यावेळी एकूण ३ हजार रुपये त्याने दिले. नंतर वेळोवेळी तो पैसे देत गेला. असे रोखीने १० हजार ५०० व ऑनलाइन ६१ हजार रुपये व्यवसायिकाने सदर महिलेला आणि वकील राठोड याला १५ हजार रुपये दिले आहेत.
काही दिवसांपासून सदर महिला ही या व्यवसायिकाला ५ लाख रुपयांची मागणी करत होती. (केसीएन)जर ५ लाख रुपये दिले नाही तर माझ्यावर आणि माझ्या अल्पवयीन मुलीवर तूने बलात्कार केल्याची खोटी तक्रार पोलीस स्टेशनला करेल अशी धमकी या व्यवसायिकाला दिली होती. त्यामुळे या व्यवसायिकाने शनिवार दि. ७ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास सापळा रचला.
सदरहू महिलेला फिर्यादी व्यावसायिकाने ४ लाख रुपयांचा चेक आणि १ लाख रुपये कॅश दिल्यानंतर पोलिसांनी महिलेसह वकील राठोड याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यांची दुचाकी देखील जप्त केली आहे. सदर व्यवसायिकाने फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.