नाशिक ‘डीआयजी’ यांची माहिती, जामनेरात घेतली समाजबांधवांची बैठक
जामनेर (प्रतिनिधी) : शहरातील पोलीस स्टेशनवर दगडफेक करून पोलिसांना जखमी केल्याप्रकरणी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी भिल समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत बालिकेच्या प्रकरणाबाबत संयम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, संशयित आरोपीला योग्य ते शासन होण्यासाठी पोलीस पूर्ण प्रयत्न करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
जामनेरात शुक्रवारी दि. २१ जून रोजी कायदा व सुव्यवस्थाबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी भेट देऊन शांततेची बैठक घेतली. सदर बैठकीस भिल समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बालिकेच्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी तपास करत असून लवकरच संशयित आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात ठेवले जाईल. शांततेच्या आवाहनाला भिल समाज पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ येथील कृष्णात पिंगळे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.