टॉवर चौकातील प्रकार उघड; पीडित महिलेची सुटका, रोख रकमेसह मोबाईल जप्त
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील अत्यंत गजबजलेल्या टावर चौकातील ‘एका लॉज’मध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने (AHTU) छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी लॉजमध्ये जागा उपलब्ध करून देऊन कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला पोलिसांनी अटक केली असून, एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.


बनावट ग्राहकामार्फत रचला सापळा
टावर चौकातील उपाध्ये लॉजमध्ये अश्लील धंदे सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ९ मे २०२६ रोजी सायंकाळी ४:३५ वाजेच्या सुमारास पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून या ठिकाणी सापळा रचला. खात्री होताच पोलिसांनी छापा टाकला असता, त्या ठिकाणी अनैतिक व्यापार सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
मॅनेजर अटकेत, ग्राहकही ताब्यात
या कारवाईत लॉजचा मॅनेजर राजू मोतीराम जोशी (वय ४५, मूळ रा. राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच घटनास्थळावरून उमाकांत बुधा महाजन (वय ३८, रा. भुसावळ) या ग्राहकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ठिकाणाहून एका २८ वर्षीय पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १० हजार ६५० रुपयांची रोख रक्कम, ५०० रुपयांची बनावट ग्राहकाला दिलेली चिन्हांकित नोट, तीन मोबाईल हँडसेट आणि आक्षेपार्ह साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अॅन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या (AHTU) पोलीस हवालदार अर्चना मधुकर भावसार, पोलीस निरीक्षक सागर शिंपी, सपोनि सुरेश आव्हाड आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. जळगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









